नळदुर्ग – येथील राजा बागसवार दर्गाजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या स्कार्पिओ गाडीतून पोलिसांनी 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपये किमतीचा 528 किलो गांजा जप्त केला आहे. 30 जुलै रोजी रात्री उमरग्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या या गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
गाडी चालवणारा अतिष राजकुमार माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या तस्करीत भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी सर्व रा. सोलापुर व राहुल रा. अहमदनगर हे देखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद कांगुने यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही सर्वात मोठी गांजा जप्ती असल्याचे बोलले जात आहे.