धाराशिव – निजामकालीन जनगणनेत ३८% कुणबी मराठा अशी नोंद असतानाही, मराठवाड्यातील निजामशासित गावांमधील कुणबी नोंदींचे दस्तावेज उपलब्ध होत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढण्यासाठी, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैद्राबादला पुन्हा एक समिती पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धाराशिव तालुक्यातील वरुडा, सारोळा गावांसह अनेक गावांमध्ये कुणबी नोंदी मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ब्रिटीश आणि निजाम राजवटीतील गावांमध्ये कुणबी नोंदीबाबत मोठी तफावत दिसून येते. निजाम राजवटीतील गावांमध्ये कुणबी नोंदींचे दस्तावेज फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. वरुडा गावापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावरील ब्रिटीश राजवटीतील उपळा गावामध्ये १,००० हून अधिक कुणबी नोंदी आढळल्या आहेत, तर वरुडा गावात केवळ एकच नोंद मिळाली आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात कुणबी नोंदी मिळविण्यासाठी पुन्हा एक समिती स्थापन करून तिला हैद्राबादला पाठविण्याची विनंती करण्यात आली. या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह मोडी व उर्दू लिपी जाणकार आणि स्थानिक युवकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आई तुळजाभवानी मंदिर संस्थानचे महंत श्री.तुकोजी बुवा यांनी मंदिरासंबंधी अनेक महत्त्वाच्या नोंदी हैद्राबादमधून मिळवल्या आहेत आणि त्यांना तेथील बारकावे माहित आहेत. त्यामुळे त्यांचाही समितीमध्ये समावेश करण्याचे सुचविण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता दिली असून निवासी उपजिल्हाधिकारी यांना त्यानुसार निर्देश दिले आहेत. या समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक गावांमधील कुणबी नोंदी मिळतील आणि मराठा समाजाला मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.