धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या बहुप्रतिक्षित कामास १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्याची ४८७ कोटी रुपयांची निविदा अंतिम करण्यात आली असून, कंत्राटदाराला नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
आज जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांना कामास सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या. या रेल्वेमार्गाच्या कामाचा कालावधी ५ वर्षांवरून अडीच वर्षे करण्यासाठी कामाचे तीन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागाचे काम लवकरच सुरू होणार असून, दुसऱ्या भागाच्या निविदा प्रक्रियेलाही गती देण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. वन विभाग व एमआयडीसीच्या जागेबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
या रेल्वेमार्गाच्या पूर्णत्वामुळे धाराशिव येथे जंक्शन होणार असून तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे. यामुळे पर्यटन, रोजगार निर्मिती व अर्थकारणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
सदरील बैठकीस प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी संजय ढवळे, तहसिलदार श्रीमती मृनाल जाधव, रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता .बनसोडे, सहाय्यक कार्यकारी अभियंतामस्के, अभियंता .नुर, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.