नळदुर्ग येथे जातीयवादी संघर्षाची घटना घडली असून, एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयत अक्षय बाळु सुरवसे यांना संदीप राठोड, सुशील राठोड आणि मनिषा राठोड यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अक्षय यांचा मृत्यू झाल्याने पोलीसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी बाळु सोपान सुरवसे (वय 52 वर्षे) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी संदीप राठोड, सुशिल राठोड, आणि मनिषा राठोड (सर्व रा. वसंतनगर, नळदुर्ग) यांनी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 ते 10:00 वाजण्याच्या दरम्यान, अक्षयवर जातीवाचक शिवीगाळ केली आणि “तू आमच्या जातीच्या मुलीवर प्रेम का करतो” तुझा बरोबर कार्यक्रम करतो असे धमकावले. यामुळे अक्षय यांचा मानसिक धक्का बसून मृत्यू झाला.
या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 105, 351(2), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2),(व्ही), 3(2), (व्ही.अ.) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणामुळे नळदुर्गमध्ये जातीय तणाव निर्माण झाला आहे.