धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत सुरू असलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच्या 17 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात वाद निर्माण झाला आहे. 30 ऑगस्ट रोजी श्रीपतराव भोसले हायस्कूल आणि गांधी विद्यालय चिखली यांच्यात झालेल्या या सामन्यात पंचांनी चुकीचे निर्णय दिल्याचा आरोप गांधी विद्यालय आणि चिखली गावातील ग्रामस्थांनी केला आहे.
गांधी विद्यालय संघाने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यानंतर, पंचांनी त्यांच्यावर अन्याय करून भोसले हायस्कूलला विजयी घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गांधी विद्यालय आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन सामना पुन्हा खेळवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान , संतप्त विद्यार्थ्यांनी धाराशिव जिल्हाधिकरी कार्यालयासमोर एक तास ठिय्या आंदोलन करून, जोरदार निदर्शने केली.
या निवेदनात मागील सामन्यातील पंचांना वगळून निःपक्षपाती आणि अनुभवी पंचांची नियुक्ती करून जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली सामना पुन्हा घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
या बातमीचे ठळक मुद्दे:
- तालुकास्तरीय खो-खो अंतिम सामन्यात पंचांवर ‘चुकीचा’ निर्णय देण्याचा आरोप
- गांधी विद्यालय आणि ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
- सामना पुन्हा खेळवण्याची आणि निःपक्षपाती पंचांची नियुक्ती करण्याची मागणी