धाराशिव: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा भव्य मेळावा होणार आहे. हा मेळावा धाराशिव येथील हातलाई मंगल कार्यालयात दुपारी 2:45 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पक्षाचे नवे नेते सुधीर पाटील यांच्या पुढाकाराने होणार आहे. सुधीर पाटील हे काही दिवसांपूर्वीच भाजपमधून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेले आहेत, आणि त्यांची थेट जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे.
अनधिकृत मंगल कार्यालयातील मेळावा
या मेळाव्याचे ठिकाण असलेल्या हातलाई मंगल कार्यालयाबद्दल एक वेगळेच वादंग आहे. हे कार्यालय सुधीर पाटील यांनी हातलाई देवीचा डोंगर पोखरून बांधले असून, ते अनधिकृत असल्याचे आरोप आहेत. या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी 15 मे 2012 रोजी निकाल दिला होता, ज्यात या बांधकामास अनधिकृत घोषित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या निकालाविरुद्ध पाटील यांनी पुढे कुठेही न्यायालयीन दिलासा मिळवलेला नाही. त्यामुळे आता या अनधिकृत मंगल कार्यालयात मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार का, याबाबत सर्वत्र चर्चा आहे.
या अनधिकृत मंगल कार्यालयाचे फायर ब्रिगेड ऑडिटही झालेले नाही, त्यामुळे येथे मेळावा आयोजित करण्यात आल्याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी याबाबत गप्प का आहेत, आणि त्यांनी सुधीर पाटील यांच्याशी हातमिळवणी केली आहे का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
अनधिकृत पुतळा आणि शाळेची इमारत
सुधीर पाटील यांच्या अनधिकृत बांधकामांबद्दलची हीच गोष्ट फक्त हातलाई मंगल कार्यालयापुरती मर्यादित नाही. पाटील यांनी धाराशिवमधील भोसले हायस्कुलच्या समोरील शासकीय मैदानावर शाळेची अनधिकृत इमारत उभी केली आहे, तसेच त्याठिकाणी गुरुवर्य के. टी. पाटील यांचा अनधिकृत पुतळा देखील उभारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या पुतळ्याला अनधिकृत घोषित केले होते आणि तो पुतळा निष्कासित करण्याचे आदेश देखील दिले होते. मात्र, सुधीर पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पुतळ्याबाबत स्थगिती मिळवली होती. आता, हातलाई मंगल कार्यालयाच्या प्रकरणातही अशीच स्थगिती मिळवली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय डावपेच आणि संरक्षणाची धडपड
सुधीर पाटील यांच्यावर धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी शासकीय जमिनी बळकावून अनधिकृत इमारती उभारल्याचे आरोप आहेत. या अनधिकृत बांधकामांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठीच पाटील यांनी भाजपमधून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाला काहीच दिवस झाले असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जवळीक दाखवण्याच्या प्रयत्नात ते असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना धाराशिव दौऱ्यावर बोलावून, या मेळाव्याचे आयोजन करून पाटील यांनी पक्षात आपली राजकीय ताकद वाढवण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह
मुख्यमंत्री शिंदे धाराशिव जिल्ह्यातील या दौऱ्यादरम्यान हातलाई मंगल कार्यालयात होणाऱ्या मेळाव्यात सहभागी होतील का, याबद्दल सर्वत्र कुतूहल आहे. या अनधिकृत बांधकामांशी संबंधित वादामुळे हा मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सुधीर पाटील यांच्या राजकीय हालचालींना आणि त्यांच्या अनधिकृत बांधकामांवरील राजकीय संरक्षणाच्या खेळाला आगामी काळात काय वळण मिळते, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष आहे.धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावारणात हा दौरा आणि मेळावा नवा वळण देणारा ठरू शकतो.