तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे. भविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. दुसरीकडे दोन नंबरच्या धंद्यांनी डोके वर काढले आहे. शहरात टायगर जुगार रासरोस सुरु असताना, पोलीस गांधारीप्रमाणे डोळ्यावर काळीपट्टी बांधून गप्प बसले होते. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर पोलिसांनी दोंघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अंमलदार अरुण लक्ष्मण शिरगिरे (वय 35 वर्षे) यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर राजेंद्र पवार (वय 24 वर्षे, राहणार शुक्रवार पेठ, तुळजापूर) आणि मंगेश दत्तात्रेय घाडगे (वय 23 वर्षे, राहणार शुक्रवार पेठ, तुळजापूर) या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 7 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:45 वाजता ही घटना घडली. आरोपींनी तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना कमी पैशात अधिक पैशाचे आमिष दाखवून ‘टायगर गेम’ नावाच्या जुगार खेळाच्या माध्यमातून फसवणूक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एकूण 1150 रुपये रोख जप्त केले आहेत. ज्ञानेश्वर पवारकडून 460 रुपये आणि मंगेश घाडगेकडून 690 रुपये रोख तसेच जुगार खेळाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.