विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत, पण तुळजापुरात आधीच राजकीय रणधुमाळी उभी राहिली आहे. तुळजापूर तालुका म्हणजे सत्तेच्या आकांक्षेचा कळस ठरला आहे, जिथे भाजपाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरुद्ध एक, दोन नव्हे, तर तब्बल आठ उमेदवार हातात दंड थोपटून उभे आहेत!
यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप – शिवसेना (शिंदे गट) – राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती झाली आहे. भाजपाच्या तिकिटावर राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. परंतु दुसरीकडे काँग्रेस – शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीतून कोण उमेदवार होणार, यावरुन तगडा संघर्ष सुरु आहे. तिन्ही पक्ष तुळजापूरच्या जागेवर आपला हक्क सांगत आहेत, आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील “तू तू – मै मै” थांबण्याची चिन्हे नाहीत.
काँग्रेसच्या ताफ्यातील जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांना त्यांच्याच पक्षातील माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे, ९० वर्षांचे असलेले मधुकरराव अजूनही उत्साहाने तुळजापूर तालुका पिंजून काढत आहेत, जणू काही त्यांची उमेदवारीच अंतिम आहे! दुसरीकडे, ऍड. धीरज पाटील महाविकास आघाडीचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आघाडीचे कार्यक्रम करत आहेत. तिन्ही पक्षाचे गमजे वाटत आहेत. परंतु त्यांच्या मेळाव्यांना काँग्रेसचे ईनी-मिनी चारच कार्यकर्ते उपस्थित असतात, त्यामुळे मेळाव्याचा उत्साह काहीसा फिका पडतोय. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे कार्यकर्ते मात्र त्यांच्या या प्रयत्नांपासून दूरच आहेत.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अशोक जगदाळे हे स्वबळावर तालुका पिंजून काढत आहेत. त्यांनी रोजगार मेळावे, महिला मेळावे अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक जनतेशी नाळ जुळवली आहे. त्यांची सोशल मीडियावरही जोरदार हवा आहे, जणू काही निवडणूक प्रचार नव्हे, तर एखादा महोत्सवच सुरू आहे! त्यांच्या कार्यक्रमांना स्थानिक जनता उत्तम प्रतिसाद देत आहे, त्यामुळे काँग्रेसला ते जवळजवळ दुर्लक्षित करत आहेत.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे खासदार ओमराजे निंबाळकर देखील भगव्या झेंड्याची ताकद दाखवण्यासाठी स्वखर्चाने मेळावे घेत आहेत. त्यांनी नुकतेच इटकळ येथे मेळावा घेतला, ज्यामध्ये त्यांनी फक्त स्वत:च्या पक्षाचे कार्यकर्तेच बोलावले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे कार्यकर्ते मात्र फाट्यावर मारल्यागत कार्यक्रमापासून दुरच ठेवले होते. ओमराजेंनी तुळजापूरसाठी हा भगवा उंचावायचा असल्याचं जाहीर केलं आहे, परंतु काँग्रेसला सोबत घेण्यास ते अनिच्छुक आहेत.
दरम्यान, एका सर्वेक्षणानुसार विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या बाजूने ४०% मतदार असल्याचं दिसत आहे. मात्र, त्यांच्याविरोधात ६०% मतदार असल्याचीही चर्चा आहे. जर विरोधकांनी एकत्र येऊन एकच उमेदवार उभा केला, तर राणा पाटील यांचा पराभव निश्चित आहे. परंतु, विरोधात दोनपेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास, राणा पाटील यांचा विजय निश्चित आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
तुळजापूरमध्ये या निवडणुकीचा सामना पाहायला मजा येणार आहे. शेवटी विजयाचा घोडा कोणावर स्वार होणार, हे जाणून घेण्यासाठी मतदार आणि नेते, दोघंही आतुरतेने निवडणुकीची वाट बघत आहेत. त्यानंतरच राजकारणाच्या या मैफिलीत कुणाचं गाणं रंगणार, ते ठरेल!