तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सध्या रंगात आला आहे. देवीच्या दर्शनासाठी गर्दी जमलेली असताना, चोरांनी भक्तांच्या गळ्याभोवती आपले ‘अदृश्य हात’ फिरवायला सुरुवात केली आहे. यंदाच्या नवरात्रात देवीच्या दर्शनासोबत ‘चोरी दर्शन’ फ्री देण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे!
दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर उमरगा येथील शिक्षिका, तोलन अंबादास दणाने (वय ५२) देवीचं दर्शन घेऊन घरी परतताना त्यांच्या गळ्यातलं १७ ग्रॅमचं सोन्याचं मिनी गंठण हसत-हसत गायब झालं. धाराशिव-हैद्राबाद बसमध्ये चढताना शिक्षिकेचं गंठण चोरट्याने इतक्या चपळाईने लंपास केलं की त्यांच्यासमोर असलेल्या भक्तांना वाटलं हे देवीचं नवस फेडण्याचं प्रकार आहे!
तुळजापूरात १५०० पोलीस तैनात असूनही चोरटे त्यांना ‘लुका छुपी’ खेळवून गारद करत आहेत. चोरीची तक्रार देण्यास गेलेल्या एका महिलेचं मात्र स्वागत देवीच्या नवरात्रासारखं नव्हे, तर ‘तुझा नवरा नेहमीच तुझं मंगळसूत्र विसरतो का?’ अशा गंमतीशीर पद्धतीने केलं जात आहे!
तोलनबाईंची तक्रार नोंदवली गेली असली, तरी चोराच्या हाती लागणं म्हणजे काजव्याच्या मागे पळण्यासारखं झालं आहे. आता भक्तगण देवीच्या नवरात्रीसाठी येताना, एक मिनी प्रार्थना घेत आहेत की, ‘देवी, दर्शनाचं ठीक आहे पण गळ्यातलं काही घेऊ नकोस!’