धाराशिव – विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, पण धाराशिव मतदारसंघात मात्र उमेदवाराचा ठावठिकाणा लागत नाही. भाजपने राज्यभरात उमेदवार जाहीर केले, पण धाराशिवची जागा मात्र “ऑन होल्ड” आहे. कारण काय? तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकाच खुर्चीवर डोळा लावून बसलेत! धाराशिवची जागा म्हणजे अगदी कुस्तीच्या आखाड्यातील एकच धडाकेबाज कुस्तीची जागा झाली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र भाजप-शिंदे गटामध्ये गोंधळ अजून संपलेला नाही. उमेदवारी मिळेल म्हणून भाजप सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये आलेले सुधीर आण्णा पाटील तर आपली तयारी अगदी जोशात करत आहेत. “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजना असो की इतर योजनांची पत्रकं, सुधीर आण्णा तर घरोघरी वाटप करूनच टाकत आहेत!
मात्र, येथे एक ट्विस्ट आहे. सुधीर आण्णांकडे कार्यकर्त्यांपेक्षा कर्मचारी जास्त आहेत! आण्णांनी आपल्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांनाच निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे निवडणुकीत उतरण्याआधीच कर्मचारी वर्ग घाम फोडतोय. आण्णांनी जर खरंच उमेदवारी पटकावली, तर कर्मचारी वर्गाला दोन महिन्यांचा पगार आण्णांच्या प्रचारासाठी “गहाण” ठेवावा लागणार आहे!
हे बघता, सर्व कर्मचारी हातलादेवीला नवस करीत आहेत की सुधीर आण्णांना उमेदवारी मिळूच नये! आता पाहायचं हे आहे की, हातलादेवीचा आशीर्वाद कोणाला मिळतो – सुधीर आण्णा की कर्मचारी वर्ग?