तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज देवीच्या चरणी येतात. काही भक्त देवीच्या प्रसादाने तृप्त होतात, तर काही चोर ‘चमत्काराने’ तृप्त होतात! तुळजापूर शहरातील एक अनोखी चोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
करीना आनंद पवार या महिलेने देवीच्या मंदिराबाहेर पोत, रुद्राक्ष माळा आणि शंख विकून आपलं पोट भरण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. रोजच्या गजबजलेल्या रस्त्यावर आपल्या लहान बाळाला कुशीत घेत ही महिला श्रद्धाळू भाविकांना माळा विकत असे. सायंकाळी सगळा माल एका पिशवीत भरून ती दुकानात ठेवत असे. सगळं सुरळीत चाललं होतं, पण एका दिवशी देवीने चमत्कार केला… चोरांचा!
शहरात थोडी वेगळी ‘भाविक’ महिला, रतनबाई बोराडे, हिचं थोडंसं वेगळं दर्शन घडतं. ती चोरलेल्या पैशातून दारू घेऊन चक्क रस्त्यावर फिरत असते, देवाच्या नावाने चोरी करत सुखी असते. एका दिवसात तिने करीना पवारची रुद्राक्ष माळा, शंख, महादेवाच्या पिंडी असलेली पिशवी उचलली आणि थेट लातूर गाठलं. चोरलेल्या पिशवीतील माल विकून १०,३०० रुपयांचे चांदीचे जोडवे, मणी एका सोनारांकडून खरेदी केले, दुसऱ्या दिवशी पुन्हा तुळजापुरात आली आणि नवा सावज शोधू लागली.
इकडे, करिना पवारचं मात्र नशीब फारच वाईट होतं. ती रडत-रडत पोलिस स्टेशन गाठली, पण पोलिसांनी तिचं दु:ख कमी करण्याऐवजी तिला थोडी ‘वेटिंग लिस्ट’ दिली. शेवटी तक्रार तर नोंदवली, पण चोर कोण? पोलिसांनाही माहित नव्हतं.
देवीने मात्र चमत्कार केला आणि करिनाला चोर रतनबाई बोराडे दिसली थेट तुळजापूरच्या बाजारात ! रतनबाईच्या हातात तिची चोरी गेलेली पिशवी होती , मात्र सर्व माल गायब ! तथापि पिशवीत चोरी गेलेल्या घराच्या दिसल्या आणि खात्री पटल्याने करिनाने ताबडतोब तिला पकडलं आणि पोलिस स्टेशनला आणलं. पण पोलिसांनी तिची नशा उतरायची वाट पाहत तिला अटक केली नाही. शेवटी अटक झाली, चोर रतनबाई बोराडे हिने चोरीची कबुली दिली शिवाय चोरीच्या पैश्यातून लातुरातील बागडे ज्वलर्स येथून चांदीचे जोडवे, मनी, मंगळसूत्र घेतल्याचे सांगितले. पण चोरीच्या मालाचा हिशोब अजून बाकीच आहे!
तुळजापूरच्या या गजबजलेल्या नगरीत, देवीचं दर्शन घेताना लक्ष असू द्या… कदाचित कुणी भाविक असेल, की ‘चोर-भाविक’ असेल, हे सांगता येणार नाही!
फिर्यादी महिला तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत ( व्हिडीओ पाहा )