धाराशिव: धाराशिव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा नुकताच बळी गेला आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसांत संपूर्ण शहरातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा नगरपरिषद व बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, धाराशिव शहरासह जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवर गेल्या २ वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे जनता मरणयातना भोगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या संदर्भात सातत्याने आंदोलने करूनही प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.
दि. १७ ऑक्टोबर रोजी ओंकार जाधवर या युवकाचा या खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. तसेच शेकडो महिला, मुले व नागरिक देखील जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.