शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 65 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. धाराशिवमधून विद्यमान आमदार कैलास पाटील तर परंडा विधानसभा मतदारसंघातून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे यावेळी दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली तेव्हा जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी एकमेव कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले होते. धाराशिवसाठी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, त्यामुळे समोर कोण राहील, याकडे लक्ष वेधले आहे.
परंडा मतदारसंघात दिवंगत आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या वारसा हक्कानुसार त्यांच्या चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रणजित पाटील यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे.त्यांचा मुकाबला शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) चे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्यासोबत होईल.
शिवसेना ठाकरे गटाची ही पहिली यादी जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.