धाराशिव – धाराशिव बसस्थानकावर सध्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ सुरू आहे. एकीकडे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून प्रवाशांना चिखलातून वाट काढत बसची वाट पाहावी लागत आहे. दुसरीकडे, दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत चोरटेही ‘सक्रिय’ झाले आहेत. विशेष म्हणजे, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास आणि लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळत असले तरी त्यांच्या गळ्यातील दागिने मात्र सुरक्षित नाहीत!
गेल्या दोन दिवसातदोन महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आसावरी कुलकर्णी यांचे तब्बल सव्वा लाख रुपयांचे सोन्याचे गोप तर सरोजा डांगे यांची पन्नास हजारांची सोन्याची पाटली चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरटे एवढे हुशार आहेत की गर्दीचा फायदा घेत चोरी करतात आणि पोलिसांना सुद्धा त्यांचा थांगपत्ता लागत नाही.
धाराशिवच्या प्रवाश्यांना चिखलात बुडलेल्या जागेत उभं राहून बसची वाट पाहणं हा रोजचा खेळ बनलाय. या प्रवाशांना आता फक्त बसचीच नव्हे, तर चोरीची सुद्धा चिंता सतावत आहे. चिखलात बुडालेल्या प्रवाश्यांच्या गळ्यात आणि हातातले दागिने मात्र चोरांच्या हाती बरोबर हेरले जात आहेत.यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस नेमके काय करतात? चोराबरोबर त्यांचे ‘अर्थपूर्ण संबंध’ आहेत का? पोलीस कुठे असतात? असे प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
तर मंडळी, धाराशिव बसस्थानकावर जायचे असेल तर सावधान! तुमचे दागिने, पैसे आणि मोबाईल जपून ठेवा. नाहीतर चोरटे तुमच्यासाठी ‘दिवाळी धमाका’ करण्यास सज्ज आहेत!