तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फेसबुकवर पोस्ट केलेल्या या शुभेच्छांमध्ये सुळे यांनी लिहिले, “तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!”
तुळजापूर मतदारसंघात आगामी निवडणुकीत भाजप आमदार राणा पाटील पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जीवनराव गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राणा पाटील यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे घनिष्ट समर्थक होते. “जिकडे पवार, तिकडे पद्मसिंह पाटील” अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत राणा पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता, ज्यामुळे पवार कुटुंब आणि पाटील कुटुंब यांच्यातील राजकीय संबंध ताणले गेले होते.
या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी राणा पाटील यांना दिलेल्या शुभेच्छा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला आहे. काहींनी याचा वेगळा अर्थ लावण्यास सुरुवात केली असून, आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे की सुळे यांचा हा संदेश निवडणुकीपूर्वी संभाव्य युती किंवा राजकीय सौहार्दाचे संकेत देऊ शकतो.
यासंबंधी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पृथ्वीराज आंधळे यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, “सुप्रियाताई या सर्व पक्षांना शुभेच्छा देत असतात; त्यामुळे या पोस्टमध्ये विशेष काही नाही. ही केवळ सौहार्द दाखवण्याची एक पद्धत आहे. आम्ही निश्चितच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करणार आणि तुळजापूर मतदारसंघात आमची ताकद दाखवणार.”
दरम्यान, या शुभेच्छांच्या निमित्ताने तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष दिसण्याची शक्यता आहे, विशेषत: पाटील कुटुंबाच्या पारंपारिक समर्थकांना या निवडणुकीत कोणता निर्णय घेणे योग्य ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.