अंतरवाली सराटी – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित केली. या बैठकीत मराठा, दलित, व मुस्लिम समाज एकत्र येण्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे परिवर्तन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जरांगे पाटील यांनी या निर्णयाची औपचारिक घोषणा दिवाळी पाडव्याच्या दिवशी, म्हणजे 2 नोव्हेंबरला करणार असल्याचे सांगितले. तसेच, कोणत्या जागांवर कोण लढणार याचा निर्णय 3 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर जाहीर केलेल्या उमेदवारांच्या विरोधात इतरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यासंदर्भात त्यांनी मुस्लिम धर्मगुरु व दलित समाजाच्या नेत्यांशी संवाद साधत एकजूट साधण्याचा प्रयत्न केला आहे. “केवळ मराठा समाजाच्या आधारावर यश मिळणार नाही, त्यामुळे दलित व मुस्लिम समाजाशीही समीकरणे जुळवावी लागणार आहेत,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या मते, मराठा-दलित-मुस्लिम एकत्र आले तरच परिवर्तन शक्य आहे, आणि यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना देखील आमदार, मंत्री होण्याची संधी मिळू शकते.
याच बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, “ज्यांच्याशी 40 वर्षे जुळले नाही, अशा लोकांना सोबत घेऊन फडणवीस यांनी सत्ता मिळवली. त्यांच्यासारखा विश्वासघातकी माणूस आज राजकारणात नाही.”
मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून दररोज विविध नेत्यांशी बैठका घेत असून, त्यांचे पाय सुजले आहेत आणि त्यांना वेदनाही होत आहे. त्यांनी सर्वांना आंतरवाली येथे न येण्याचे आवाहन करत “मी पैशांवर पाठिंबा देतो असे सांगणाऱ्याचे नाव मिळाल्यास त्या माणसाचा खात्मा करेन,” असेही स्पष्ट केले. या घटनाक्रमामुळे विधानसभा निवडणुकीतील मराठा समाजाच्या भूमिकेला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.