आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. धाराशिव जिल्ह्यातील तीन प्रमुख मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीला महायुती आणि महाविकास आघाडीने यशस्वीपणे थांबवले आहे. धाराशिव, तुळजापूर आणि भूम-परंडा या मतदारसंघांत आता थेट मुकाबले पाहायला मिळणार आहेत.
धाराशिव मतदारसंघ:
धाराशिव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्याविरोधात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या तीन नेत्यांनी बंडखोरी केली होती. सूरज साळुंके, शिवाजी कापसे आणि सुधीर पाटील यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या बंडखोरीमुळे महायुतीची चिंता वाढली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट हस्तक्षेपामुळे या तिघांनी आपले अर्ज परत घेतले. शिंदे यांनी केलेल्या फोन कॉलनंतर बंडखोरांना मनवण्यात आले, ज्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास पाटील यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू राजे निंबाळकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. निंबाळकर यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जरांगे यांच्याकडून अपेक्षित पाठिंबा मिळू शकला नाही, त्यामुळे निंबाळकर यांनी अर्ज परत घेतला. या माघारीमुळे धाराशिव मतदारसंघात आता आ. कैलास पाटील (शिवसेना – उबाठा) आणि अजित पिंगळे (शिवसेना – शिंदे) यांच्यात सरळ लढत होणार आहे.
तुळजापूर मतदारसंघ:
तुळजापूर मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात सुरुवातीला दोस्तीत कुस्ती पाहायला मिळत होती. महाविकास आघाडीतून काँग्रेसकडून ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर राष्ट्रवादीकडून जीवनराव गोरे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, गोरे यांनी शेवटच्या दिवशी अर्ज परत घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार ऍड. धीरज पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
तसेच काँग्रेसचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारास आव्हान दिले होते. परंतु चव्हाण यांनीही अखेर माघार घेतली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर अशोक जगदाळे आणि संजय निंबाळकर यांनी देखील अर्ज परत घेतले आहेत. यामुळे तुळजापूर मतदारसंघात आता काँग्रेसचे ऍड. धीरज पाटील आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यात थेट मुकाबला होणार आहे.
तुळजापूरमध्ये भाजपमध्येही बंडखोरी झाली होती. भाजपचे ऍड. व्यंकट गुंड यांनी विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांनीही अर्ज परत घेतला आहे, त्यामुळे भाजपमधील अंतर्गत तणाव निवळला आहे.
भूम-परंडा मतदारसंघ:
भूम-परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता कारण शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाने रणजित पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने राहुल मोटे यांना उमेदवारी दिली होती. यामुळे आघाडीत मतभेद झाले होते. परंतु या मतदारसंघातील जागा राष्ट्रवादीला दिल्याने रणजित पाटील यांनी अर्ज परत घेतला आहे.
आता या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे राहुल मोटे यांच्यात सरळ लढत होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तीनही प्रमुख मतदारसंघांमध्ये आजच्या अर्ज परत घेण्याच्या प्रक्रियेनंतर बंडखोरी थांबली आहे. त्यामुळे धाराशिव, तुळजापूर आणि भूम-परंडा या तीनही मतदारसंघांमध्ये आता सरळ लढती होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना माघार घ्यायला लावून निवडणूक शांततेत होण्यासाठी मार्ग मोकळा केला आहे.