नांदेड येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, हा हल्ला जरांगेंच्या सांगण्यावरूनच घडवून आणला गेला आहे.
स्नेहाताई सोनकाटे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सवाल उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “प्रचाराच्या धावपळीत असताना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी माझ्या सहकाऱ्यांकडून कळली. समाजात चर्चा आहे की, हा हल्ला जरांगेंच्या सांगण्यावरून झाला आहे. जरांगेंनी लढायचं की पाडायचं याचा संभ्रम सोडवावा. मराठा समाजाचा पाठिंबा आता त्यांच्या मागे उरलेला नाही, तर उलट हाके सरांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला भावली आहे.”
जरांगेंच्या आक्षेपार्ह भाषणांवर कारवाईची मागणी
सोनकाटे यांनी दावा केला की जरांगेंच्या भडकावू भाषणांमुळे ओबीसी कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांनी सरकारकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करताना सांगितले, “जरांगेंनी आपल्या वैयक्तिक आकसापोटी प्राध्यापक हाके यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे. ओबीसी समाजाची चळवळ दिवसेंदिवस मजबूत होत आहे, आणि या चळवळीचा आवाज दाबण्यासाठी माणसांवर हल्ला करण्याचं पाताळयंत्री धोरण अवलंबलं जात आहे.”
कठोर भूमिका घेण्याची तयारी
जर परिस्थती आणखी बिकट झाली, तर सोनकाटे यांनी ओबीसी, उपेक्षित, आणि वंचित घटकांवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी संघर्षाची घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या, “जर गरज पडली, तर हाके सरांसह सर्व ओबीसी आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ही धनगरांची वाघिण आणि अहिल्येची लेक मैदानात उतरायला तयार आहे. आम्ही बाळूमामा आणि बापू बिरु वाटेगावकरांना मानतो, आणि गरज पडल्यास लढाईसाठी हातात काठी घेऊन उभे राहू.”
डॉ. स्नेहाताई आप्पाराव सोनकाटे, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असून, त्या आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत ओबीसी आणि मराठा समाजातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.