परंडा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंडा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंड्यात जाहीर सभा घेतली. या सभेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मशालीवर टीका करत, “उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी मशाल आहे,” असे वक्तव्य केले.
उद्धव ठाकरे यांची मशाल घराघरांत आग लावणारी, समाजात तेढ आणि द्वेष निर्माण आहे, या निवडणुकीत मशाल विझवून टाका, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न झाला म्हणून आम्ही उठाव केला आणि तानाजी सावंत यांनी आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले. भूम-परंडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी भूम-परंडा मतदारसंघ तुतारी गटाला देऊन टाकला आहे.”
यावेळी शिंदे यांनी महिलांसाठी विशेष घोषणा केली. “लाडक्या बहिणींना आम्ही सध्या दर महिना दीड हजार रुपये देत आहोत. परंतु पुन्हा सत्तेवर आल्यास हा रक्कम २१०० रुपये करू,” असे त्यांनी सांगितले.
तानाजी सावंत यांना आमदार करण्याची जबाबदारी तुमची तर नामदार करण्याची जबाबदारी माझी, असेही शिंदे यांनी शेवटी सांगितले.