मुरुम: उमरगा तालुक्यातील मुरुम पोलिसांनी गुटखा तस्करी प्रकरणात बनावट कारवाई केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुरुम-आष्टाकासार रोडवरील आचार्य तांड्याजवळील कोरड्या तळ्यात एका सिफ्ट कारचा अपघात झाला. या अपघातग्रस्त कारमधून तब्बल ७ लाख रुपयांचा हिरा पान मसाला नावाचा गुटखा सापडला. मात्र, मुरुम पोलिसांनी हा गुटखा कोथळी चेक पोस्टवर पाठलाग करून पकडल्याचे खोटे दाखवून बनावट कारवाई केली आहे.
एमएच १, बीटी ६१४४ क्रमांकाची ही सिफ्ट कार अपघातात पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली होती. या कारमध्ये पोत्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचे पाकीट आढळून आले. प्रत्यक्षात कार अपघातग्रस्त झाल्याने पोलिसांना घटनास्थळी हा गुटखा जप्त करायला हवा होता. मात्र, पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोथळी येथे असलेल्या चेक पोस्टचा फायदा घेत हा गुटखा तिथे पकडल्याचे दाखवले. सपोनि संदीप दहिफळे यांनी ही बनावट कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.
कर्नाटक राज्यातून धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुम पोलिसांना गुटखा तस्करांकडून एका गाडीमागे २२ हजार रुपये हप्ता मिळतो. अपघातग्रस्त झालेली कार सुद्धा हप्त्यामधील असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अपघात झाल्यामुळे आणि गुटखा उघडकीस आल्याने पोलिसांना नाईलाजास्तव कारवाई करावी लागली.
या बनावट कारवाईमुळे मुरुम पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गुटखा तस्करी आणि पोलिसांच्या हप्तेखोरीच्या या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.