धाराशिव – गुटखा तस्करीत अडकलेल्या नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक अंधारे यांच्यासह सात जणांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली होती. आता या सर्वावर मोठी करण्यात आल्याची बातमी हाती आली आहे.
गुटखा तस्करीत अडकलेल्या सातही पोलीस कर्मचाऱ्यांची तीन वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात आली असून सर्वाना आता किमान तीन वर्षे पोलीस मुख्यालयातच ड्युटी करावी लागणार आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
गुटखा प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी कश्या प्रकारे तोडपाणी केली , याची मालिकाच धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केली होती. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी नीलेश देशमुख यांनी सर्व पोलिसांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे घेतले आणि नंतर चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना पाठवला होता, त्यानंतर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह सात पोलीसांची धाराशिव पोलीस मुख्यालयात बदली केली.
काय आहे प्रकरण ?
निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.
गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या सांगण्यावरूनच आपण गुटख्याचा सदर टेम्पो ताब्यात घेतला पण पोलिसांनी वाटा देण्याऐवजी दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याने हे झिरो पोलीस चांगलेच चिडले. यातील सय्यद अमीर अझहर जहागीरदार याच्या चुलत्याने सर्व पुरावे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिल्याने गोरेंची अवघ्या चार दिवसात पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह सहा पोलीसांची धाराशिव मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली . त्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल सागर, नेताजी दगडू गेजगे, विश्वनाथ शिंदे, नितीन राठोड, बलदेवसिंग ठाकूर आदींचा समावेश आहे.त्यानंतर आता सातही पोलीस कर्मचाऱ्यांची तीन वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात आली असून सर्वाना आता किमान तीन वर्षे पोलीस मुख्यालयातच ड्युटी करावी लागणार आहे.
सात पोलीस कर्मचारी आणि झिरो पोलीस यांच्याबरोबर अनेकवेळा मोबाईल संभाषण झाल्याचे सीडीआर चौकशीमध्ये मिळाले असून, जबाबात प्रत्येकानी वेगवेगळे कारण सांगितले आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
गुटखा तस्करी प्रकरणी तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना पाठवलेला चौकशी अहवाल माहितीच्या अधिकारात मागण्यात आला होता पण माहिती देण्यात आली नाही. कोणतेही कारण न देता अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे पुढे अपील करण्यात येणार असल्याचे सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले.
के.बी. वर कारवाई केव्हा होणार ?
तुळजापूर उड्डाण पुलाजवळ के.बी. ने एक गुटख्याची गाडी अडवून तोडपाणी केली होती, त्याची बातमी देखील धाराशिव लाइव्हने दिल्यानंतर या के.बी. ला देखील नोटीस बजावण्यात आली होती. त्याने गोलमाल उत्तर त्यावेळी दिले होते.
तेरखेडा बिट पाहणारा हा वसूलदार पोलीस पूर्वी महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत होता. त्याचे आणि गुटखा किंग नकुल पंडित ( साळवी ) याचे थेट संबंध आहेत, गुटखा तस्करीतून मिळालेल्या पैश्यातून त्याने पुण्यात चार फ्लॅट, चार चाकी वाहने, वाशीजवळ प्लँटिंगची जमीन घेतली आहे. या के.बी. ची अद्याप उचलबांगडी का केली नाही ? याबाबत पोलीस मुख्यालयात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.