धाराशिव: धाराशिव शहरात हिट अँड रन अपघातात दोन शाळकरी मुले मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागेश विलास काळे (१६) आणि अमित पापा शिंदे (१५), दोघेही बुकनवाडी येथील रहिवासी, हे धाराशिव ते तुळजापूर रस्त्याने वडगाव शिवारातून पायी जात असताना हा अपघात झाला.
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ एका पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात करणारा कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
अमित शिंदे यांचे वडील पापा गागन शिंदे यांनी २४ नोव्हेंबर रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.न्या.सं. कलम 106(1), 281 सह कलम 184, 134(अ) (ब) मो वा का अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघातस्थळी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारचालकाचा शोध घेत आहेत.