धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सगळीकडे “पिपाणी वाजली” अशी चर्चा रंगली! पण या पिपाणीच्या नादात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे मात्र धक्का खाऊन बसले. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 1,509 मतांनी विजय मिळवत परंड्यातील राजकीय व्यासपीठावर आपला डंका वाजवला.
सावंत यांना मिळाली तब्बल 1,03,254 मते, तर मोटे यांना 1,01,745 मते. इथपर्यंत ठीक होतं, पण खरी गंमत अपक्ष उमेदवार जमीलखान महेबूब पठाण यांनी घडवली. मोटे यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तर पठाण यांचे निवडणूक चिन्ह ट्रम्पेट म्हणजे पिपाणी ! पण या दुसऱ्या पिपाणीवर तब्बल 4,446 मतं मिळाली आणि राहुल मोटे यांचा “तुतारीचा सूर” चक्क बेसूर झाला.
निवडणूक मतमोजणीच्या वेळी पिपाणीच्या चिन्हाने मतदारांचा घोळ उडवला. “ही पिपाणी कुणाची?” असा प्रश्न मोजणी केंद्रावर अनेकांना पडला होता. अखेर पिपाणीच्या गोंधळात मोटे यांची ‘तुतारीची हवा’च गेली, आणि सावंत यांनी विजयाचा झेंडा फडकावला.
राजकीय गमतीतून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली – निवडणुकीत फक्त उमेदवारांचीच नाही, तर चिन्हांचीही जादू चालते! परंड्यात पिपाणीमुळे तुतारी वाजली, पण ती फक्त सावंतांच्या विजयाची!