धाराशिव – परंडा तालुक्यातील सोनारी शिवारात १७ नोव्हेंबर रोजी हरण ओढा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आता, अखेर पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत चौघा आरोपींना अटक केली आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृत महिलेचे वय अंदाजे ३० वर्षे असून तिच्या डाव्या हातावर “प्रकाश” असे गोदलेले होते. तिच्या शरीरावर आणि डोक्यावर वार करून तिचा खून करण्यात आला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकण्यात आला होता. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रामकिसन दगडू कुंभार या पोलीस नाईकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याने पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. यामधून एक संशयित स्विफ्ट डिझायर कार दिसून आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या कारचा शोध घेतला असता ती पढेगाव श्रीरामपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने पढेगाव गाठून कारसह चालक संदीप उत्तम तोरणे याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला तोरणेने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी त्याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे श्रीरामपूर येथील विश्वास नामदेव झरे याच्याशी अनैतिक संबंध होते. ती त्याला सतत पैशांची मागणी करून त्रास देत होती. त्यामुळे झरे याने तोरणे, सोमनाथ रामनाथ कराळे आणि महेश कुंडलीक जाधव या तिघांना मिळून ९२,००० रुपये देऊन महिलेची हत्या करण्याचे कट रचला.
१६ नोव्हेंबर रोजी रात्री या चौघांनी महिलेला तुळजापूरला देवदर्शनासाठी जाण्याचे आमिष दाखवून नेवासा फाट्यावरून घोडेगाव, अहमदनगर, कडा आष्टी, जामखेड, खर्डा आणि आंबी मार्गे सोनारी गावाजवळील पुलावर नेले. तेथे त्यांनी तिचा गळा आवळून आणि डोक्यात दगड मारून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकला.पोलिसांनी तोरणे याला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांनीही गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, सुदर्शन कासार यांच्यासह पोलीस हवालदार विनोद जानराव, शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, फरहान पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, विनायक दहिहंडे, पोलीस अंमलदार नागनाथ गुरव आणि सुनिल मोरे यांच्या पथकाने केला आहे.