धाराशिव: धाराशिव येथील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर नगरपालिकेचे जवळपास २० रोजदारी कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. सध्या एका प्रमाणपत्र प्रकरणात अडचणीत आलेले हे अधिकारी, आपल्या निवासस्थानी साफसफाई, बागकाम, देखभाल इत्यादी कामांसाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा गैरवापर करीत असल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तीन सफाई कर्मचारी नगरपालिकेच्या मस्टरवर असून, त्यांच्या उपस्थितीची नोंद नियमितपणे केली जाते. मात्र, इतर कर्मचाऱ्यांना दरमहा पालिकेत गोळा झालेल्या लाचेतून रोख रक्कम दिली जाते असा गंभीर आरोप आहे. या अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर एवढ्या मोठ्या संख्येने नगरपालिकेचे कर्मचारी का कार्यरत आहेत? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या कर्मचाऱ्यांचा वापर खाजगी कामांसाठी केला जात असल्याने, नगरपालिकेच्या कामावर त्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
सरकारी गाडीचा खाजगी वापर?
याशिवाय, या अधिकाऱ्यांनी आपल्या सरकारी गाडीचा गैरवापर केल्याचा आरोप देखील आहे. अधिकाऱ्यांच्या पत्नीने ही गाडी कर्नाटक, कोल्हापूर, सातारा येथे नेल्याची चर्चा आहे. तसेच साहेबांची पत्नी शहरातही खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सरकारी गाडीचा वापर खाजगी कामांसाठी करणे हा नियमबाह्य आणि गैरकृत्य असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जावी अशी मागणी होत आहे.या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.