भूम – येथील वेताळ रोडवरील जय म्युझिकल अँड मोबाईल शॉपमधून 6.89 लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून 5.35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहन रामचंद्र बागडे ( वय 41 वर्षे, रा. शिवाजी नगर, भूम ) यांच्या फिर्यादीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी रात्री 9 ते 19 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.30 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील टेक्नो, विवो, सॅमसंग, वन प्लस, रेडमी आदी कंपन्यांचे मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच असा एकूण 6,89,866 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी चोरीला गेलेल्या काही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव, भुम, मोहा, ढोकी, माळकरंजा येथे असल्याचे शोधून काढले. या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी भिमा काळे आणि राजू अर्जुन काळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष श्रीरंग चव्हाण यालाही ढोकी येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून 25 मोबाईल फोन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.