धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ‘लाच प्राध्यापिके’चे प्रताप सध्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. अंबाजोगाई आणि उमरगा येथे तिच्या ‘प्रतापांचा’ डंका वाजल्यानंतर, आता कळंबच्या भानगडीमुळे तिच्या ‘सुप्रसिद्ध’ कार्याची उजळणी होत आहे.
ही प्राध्यापिका भ्रष्टाचारात इतकी पटाईत आहे की सरकारी खुर्चीची मखमली थर न पाहता, खाजगी गाडी घेऊनच लाच घेते म्हणे! कळंब तहसीलदार असताना तिने गोरगरिबांच्या रेशनच्या गव्हात, तांदळात आणि नशिबात चक्क भ्रष्टाचाराचे ‘विष’ कालवले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी धाडसी तपासणी केली तेव्हा गोदामातून शेकडो पोते धान्य गायब असल्याचे उघडकीस आले.
“आधी पोते गायब, मग ती!” अशी परिस्थिती झाली. गुन्हा दाखल होताच प्राध्यापिकेने ‘लाचलुचपत नाटक मंडळा’चा ताबडतोब प्रयोग सादर केला – फरारीची भूमिका बजावत! मात्र, अटकपूर्व जामीन मिळाल्यावर, ही ‘शोभा’ परत आली, ती थेट खुर्चीवर बसायला.
आता लोकांमध्ये चर्चा आहे की या ‘लाच प्राध्यापिके’चा नवा कार्यभाग कोणता असेल? काहींनी तर सुचवले आहे की तिला एक ‘भ्रष्टाचार पुरस्कार’च द्यावा! कारण तिच्या ‘प्रतापां’ने भ्रष्टाचाराच्या दुनियेतील इतरांना लाजवले आहे.
धाराशिवमध्ये सध्या फक्त एकच चर्चा आहे – “ही लाच प्राध्यापिका कुठे आणि कधी सुसाट होईल, याचा थांगपत्ता नाही!”