नागपूर: धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दहशत दाखवून जमीन बळकावण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत केला आहे. तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावात बाऊन्सरच्या मदतीने शेतकऱ्यांना धमकावण्यात आल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमदार पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्यावरून हा विषय सभागृहात मांडला. जवळगा मेसाई गावात काळ्या रंगाच्या दहा ते बारा गाड्यांमधून मोठ्या संख्येने बाऊन्सर आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केली. यावेळी पोलीस मात्र निष्क्रिय राहिले, असा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी तर पोलीसच कंपनीच्या लोकांना सहकार्य करताना दिसतात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पवनचक्की कंपनीच्या दहशतीला आळा घालणे आवश्यक असल्याचे सांगत, पोलीस आणि गुंडागर्दी करणाऱ्या बाऊन्सरवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.