नागपूर: तुळजापूर, धाराशिव आणि औसा या तीन तालुक्यांतील २३ गावांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया आणि त्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्ती कामास सुरुवात होईल, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मोठ्या भगीरथ प्रयत्नांनी सुरू केलेला हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याची जबाबदारी आपली असल्याचे निवडणुकीपूर्वीच सांगितले होते. त्यानुसार तीन तालुक्यातील २३ गावांसाठी महत्वपूर्ण असलेल्या या दुरुस्तीच्या कामासाठी महायुती सरकारने निधीची तरतूद केली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच या प्रकल्पाच्या दुरूस्ती खर्चासाठी ११३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, ठाकरे सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सुरुवातीच्या अडीच वर्षात या प्रकल्पाच्या दुरूस्तीबाबत काहीच हालचाल झाली नाही. आता ११३ कोटी रुपयांच्या दुरूस्ती प्रस्तावास पाठपुराव्यामुळे सुरुवातीला तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर महायुती सरकारच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यताही मिळवण्यात आली.
या महत्वपूर्ण योजनेच्या दुरुस्तीसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी नोव्हेंबर २०२२ मध्ये विनंती करण्यात आली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचवेळी जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
भविष्यात ज्या उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणार आहेत, त्या सर्व बंद पाईपलाईनद्वारेच राबविण्याचा धोरणात्मक निर्णय महायुती सरकारने यापूर्वीच घेतलेला आहे. त्यामुळे आता निम्न तेरणेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे थेट शेतकरी बांधवांच्या शिवारात दाखल होणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात टळून सिंचनक्षेत्र सहा हजार हेक्टरवरून नऊ हजार हेक्टर होणार आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे यापूर्वीच निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेसाठी ४२ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही आणि होणारही नाही, असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.