धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच वाघाचे दर्शन झाले असून, येडशी परिसरात त्याचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने त्रस्त असलेल्या जिल्ह्यात आता वाघाच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या वाघाने दोन गाईंवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला असून, वन विभागाकडून त्याचा फोटोही प्रसारित करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात बिबटेही तुरळक प्रमाणात आढळत होते, मात्र आता वाघाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या वाघाला पकडण्यासाठी वन विभाग सतर्क झाला असून, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी तालुक्यात तसेच येडशी भागात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. आतापर्यंत दोन बिबटे आणि एक वाघ आढळून आला असून, वन विभागाला तो अद्याप सापडलेला नाही. या प्राण्यांमुळे आतापर्यंत चार जनावरे मृत्युमुखी पडली असून, दोन माणसांवर हल्ला झाला आहे.
या गंभीर समस्येवर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला आहे. “धाराशिव जिल्ह्यात वाघ कुठून आला?” असा सवाल करत त्यांनी वाघ आणि बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे. रात्रीच्या वेळी वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.
वन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबटे आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.