धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, नळदुर्ग, लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे वृत्त आहे. हॉटेल्स, पानटपरी, किराणा दुकानांमध्ये राजरोसपणे गुटखा विक्री होत असून, जिल्ह्यात गुटख्याची तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा ही ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी’ समजली जाते. या विभागाचा पदभार वासुदेव मोरे यांच्याकडे होता. मात्र, चार महिन्यांपूर्वी नवीन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोरे यांच्याकडील पदभार काढून गणेश कानगुडे यांच्याकडे सोपविला आहे. परंतु, कानगुडे हे देखील कोणतीही कारवाई न करता गप्प बसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या अवैध धंद्यांमुळे जिल्ह्यातील तरुणांचे आरोग्य धोक्यात येत असून, पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.