धाराशिव – मराठवाड्याच्या न्यायहक्काच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. 2 मधील पाचव्या टप्प्याचे काम अंतिम होत आले आहे. यावर्षी झालेला अधिकचा पाऊस, भूसंपादन प्रक्रियेत जाणीवपूर्वक आणलेले अडथळे व वीज वाहक तारेच्या चोरीमुळे डिसेंबर अखेरीस अपेक्षित असलेली पंपगृहाची चाचणी आता जानेवारीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सिंदफळ तलावातील पाणी तुळजाभवानी देवीच्या चरणी रामदरा तलावात पुढील महिन्यात दाखल होणार असून या कार्यक्रमासह अतिशय महत्वपूर्ण असलेल्या या योजनेच्या पाहणी व आढावा बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना केली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
बुधवार २५ डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत महत्वाची आढावा बैठक घेण्यात आली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचे तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. उपसा सिंचन योजना क्र. २ बरोबरच एकूण प्रकल्प कार्यान्वित होण्यास नक्की किती कालावधी लागणार, नेमक्या कोणत्या अडचणी अजूनही आहेत आणि त्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत सविस्तर चर्चा झाली. कालमर्यादा निश्चित करून प्रत्येक शिल्लक काम पुर्ण करण्याबाबतचा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्ता देण्यात आला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक २ चे काम सध्या मोठ्या वेगात सुरू आहे. यावर्षी अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने तसेच भूसंपादन प्रक्रियेत जाणीवपूर्वक आणलेले अडथळे व वीज वाहक तारेची 2 वेळा झालेली चोरी यामुळे यापूर्वी निर्धारित केल्यानुसार डिसेंबर अखेरीस चाचणी घेता आली नाही. या बाबींवर आता तोडगा काढण्यात आला असून जानेवारीत टप्पा क्रमांक ५ ची चाचणी घेण्यात येणार आहे. पाचव्या टप्प्याच्या चाचणीसह , या महत्वपूर्ण प्रकल्पाची पाहणी व आढावा बैठक घेण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना वेळ देण्याची विनंती करण्यात आली आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा क्र.२ अंतर्गत एकूण ५ पंपगृह आहेत. यापैकी टप्पा क्र. 2, 3 व 5 मधील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा क्र. १ व ४ मधील ही ७५ टक्क्यांहुन अधिक कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने टप्पा क्र.१ व ४ मधील कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कामाचा नियोजित आराखडा जाणून घेत स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विभागाच्या अधिकारी आणि कंत्राटदरांनी सु-समन्वयाने नियोजनानुसार काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या आहेत. भूसंपादनाबाबत असलेल्या अडी-अडचणी प्राधान्याने दूर करण्याबाबत सोलापूर आणि पुणे जिल्हाधिकारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत आणि सर्व भूसंपादन प्रकरणे निकाली काढणेबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
सदरील बैठकीस अधीक्षक अभियंता वि. ब. थोरात, कृष्णा मराठवाडा बांधकामचे कार्यकारी अभियंता अ. आ. नाईक, सोलापूर यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यु.ई.पेरंपल्ली, उपअभियंता श्री रणदिवे, छत्रपती संभाजी नगर येथील गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाचे उपअभियंता श्री तांडारे, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागाच्या टप्पा क्र. ५ चे सहाय्यक अभियंता यो. सु. घुले, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग तुळजापूरचे उपअभियंता पी. यु. मंगरुळे, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग धाराशिवचे उपविभागीय अधिकारी व्ही. एस. पाटील यांच्यासह कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी घेणार पंधरा दिवसाला आढावा : आमदार पाटील
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार व सादर केलेल्या नियोजनानुसार प्रकल्पाचे टप्पा निहाय काम निर्धारित कालावधीत पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्पाचे महत्व लक्षात घेवून कामांची टप्पा निहाय प्रगती व वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना दर 15 दिवसाला आढावा घेण्याचे सूचित केले आहे.