धाराशिव जिल्ह्यात गुटख्याच्या तस्करीने वेग घेतला असून, सध्या ‘लाईन’चा खेळ जोरात सुरू आहे. मुरूम लाईनचा वसुलदार रणखांब निलंबित झाल्यानंतर तिकडे थोडासा ‘ब्रेक’ लागला आहे, पण दुसऱ्या लाईनवर मात्र ‘पार्टी’ जोरात सुरू आहे. आता रणखांबनंतर दुसऱ्या लाईनचा वसुलदार कधी निलंबित होणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
गुटखा तस्करीच्या ‘रोड मॅप’बद्दल बोलायचे झाले, तर कर्नाटकातून येणाऱ्या गोवा, विमल, हिरा ब्रँडच्या गुटख्याची खेप उमरगा, लोहारा, बेंबळी, धाराशिव, वाशी, भूम अशा पोलीस हद्दीतून जामखेड मार्गे नगरला जाते आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्रात ‘डिलिव्हरी’ होते. या सगळ्या चक्रात पोलिसांचे डोळे झाकले जातात आणि हप्ता व्यवस्थित पोहोचत असल्याने त्यांचा ‘मूग’ गिळून गप्प राहण्याचा नवा विक्रम सुरू आहे.
या ‘गुटखा-फ्लो’च्या स्क्रिप्टला थेट ‘पुष्पा पार्ट 2’ चित्रपटाची झलक आहे. करमाळा पोलीस स्टेशनचा वसुलदार हा सगळा गुटखा ऑपरेशन ‘मॅनेज’ करत असल्याची चर्चा आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला वेळेवर हप्ता पोहोचवण्याची ‘हॅप्पी डिलिव्हरी’ ही त्याची खासियत असल्याने स्थानिक गुन्हे शाखाही ‘चिअर्स’ करत गप्प बसली आहे.
आता मोठा प्रश्न आहे – सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कधी या ‘करमाळा वसुलदार’च्या मागे ‘सिक्रेट सुपरस्टार’सारखी कारवाई करतील? की रणखांबप्रमाणे हा वसुलदारही एका ‘लाईन’वरून खाली येईल? जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत… पण तोपर्यंत ‘गुटखा’ची गाडी धडधडत सुरूच आहे!