लोहारा: पैसे देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला दुचाकीवरून पळवून नेणे, तिच्याशी बळजबरीने लग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. नराधमाने पीडितेला मारहाण करत, ‘माझ्यासोबत झोपली नाहीस तर तुला मारून टाकीन किंवा चिठ्ठी लिहून स्वतः आत्महत्या करेन’, अशी धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे देण्याचे आमिष दाखवून पळवले
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी एका स्थानिक बसस्थानकावर थांबली होती. यावेळी गावातीलच एका तरुणाने तिला गाठले आणि ‘तुला पैसे मिळवून देतो’ असे आमिष दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणी त्याच्या मोटरसायकलवर बसली. मात्र, आरोपीने तिला घरी न नेतात दुसऱ्या ठिकाणी पळवून नेले.
बळजबरीने लग्न आणि अत्याचार
आरोपीने ४ जूनच्या पहाटे ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत पीडितेशी बळजबरीने लग्न लावले. त्यानंतर त्याने पीडितेला गालावर चापट मारून मारहाण केली. “तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीस, तर मी तुला जीवे मारीन किंवा तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून स्वतःला काहीतरी करून घेईन आणि तुला अडकवीन,” अशी धमकी त्याने दिली. या भीतीच्या दडपणाखाली आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ
एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडितेच्या घरासमोरील रस्त्यावर थांबून तिच्या समाजाबद्दल अत्यंत हीन दर्जाचे शब्द वापरत जातीवाचक शिवीगाळ केली आणि परिसरात दहशत माजवली.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
या भयंकर प्रसंगानंतर पीडित तरुणीने ११ जून रोजी लोहारा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी पीडितेच्या प्रथम खबरेवरून आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम ६४(१) (बलात्कार), ११५(२) (इच्छेने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी) सह कलम ३(१)(w), ३(२)(v), ३(१)(r)(s) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






