धाराशिव: धाराशिव जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील मंत्री नको असल्याची मागणी मराठा सेवकांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मंत्री (धनंजय मुंडे, पंकजा मुंडे ) धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, बीड जिल्ह्यातील अवैध आणि गुन्हेगारी स्वरूपाची संस्कृती धाराशिव जिल्ह्यात नको असल्याचे मराठा सेवकांनी म्हटले आहे.
याशिवाय, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि मदत करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही मराठा सेवकांनी केली आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत ७ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा सेवक आमरण उपोषण करणार आहेत.
बीड जिल्ह्यातील संस्कृती नको
मराठा सेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीड जिल्ह्यातील मंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी काही हालचाली चालू आहेत. पण जिल्ह्यातील इतिहास पाहता तेथील अवैध तसेच गुन्हेगारी स्वरूपाची संस्कृती आमच्या धाराशिव जिल्ह्यात नको आहे. आमच्या जिल्ह्यात भाई उद्धवराव पाटील, प्रमोद महाजन यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही आमच्या संस्कृतीचे तसेच गुन्हेगारी वाढणार नाही याची येथे काळजी घेऊन आम्ही आमची वाटचाल करतो.”
संतोष देशमुख यांच्या खुनाचा संदर्भ
पवनचक्कीसाठी झालेला संतोष देशमुख यांचा खून पाहता आमच्या जिल्ह्यामध्येही असेच पवनचक्कीचे जाळे पसरले आहे. त्यामध्ये अशीच गुंड प्रवृत्तीची लोक त्यांना या जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आम्ही धाराशिवकर म्हणून आम्ही हे कदापि होऊ देणार नाही,” असेही मराठा सेवकांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप
“संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी हे वारंवार गुंड प्रवृत्तीचे सराईत गुन्हेगार असताना यांच्यावर बीड जिल्ह्यातील मंत्री धनंजय मुंडे त्याच्या हस्तक वाल्मीक कराड व बगलबच्चे यांना वाचवण्याची मेहरबानी करत असल्याचे दिसत आहे,” असा आरोपही मराठा सेवकांनी केला आहे.
चौकशी समितीवरही प्रश्नचिन्ह
“चौकशी समिती एसआयटी जरी नेमली असली तरी त्या एसआयटीमध्ये त्यांच्या निकटवर्तीय अधिकारी असल्याचे काल पुराव्यानिशी नमूद केले आहे,” असेही मराठा सेवकांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
“आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर होतो हे आमच्या पोलीस खात्याचे व गृहखात्याचे अपयश आहे. अशी भावना संपूर्ण महाराष्ट्राची झाली आहे. सदरचे सर्व आरोपी पुण्यात अटक होत आहेत हे देखील संशयास्पद आहे. तरी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांना अधिकारीच वाचवत आहेत असे तर नाही ना?” असा सवालही मराठा सेवकांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे आशा
“संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आशा लावून बसला आहे. त्यांनी सदरच्या लोकांवर कठोर कारवाई करून आमच्या संवेदनशील महाराष्ट्राची परंपरा कायम राखावी. असे न झाल्यास समाज तुमच्या विरोधातही आंदोलन करायला कोणतीही गय करणार नाही,” असा इशाराही मराठा सेवकांनी दिला आहे.
Video