धाराशिव: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या धाराशिव शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे. यांचा उरुस १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र, या उरुसाच्या निमित्ताने दर्गाह समोरील मैदानावर अनधिकृत झुले-मोठमोठे पाळणे उभारण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची कोणतीही परवानगी न घेता हे अनधिकृत झुले-पाळणे उभारण्यात येत आहेत. उरुसात येणाऱ्या लोकांकडून प्रति व्यक्ती १०० रुपये घेणाऱ्या झुले-पाळणा मालकांनी सरकारचा करही बुडवला आहे. काही लोक जागेचा ठेका घेऊन, अनधिकृत झुले-पाळणे उभारणी करत आहेत. ठेकेदार वेगळा, पाळणा मालक वेगळा, परवानगी मागणारा वेगळा दलाल अशी परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.
या अनधिकृत उभारणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याठिकाणी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या अनधिकृत उभारणीकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.