अणदूर: पावणे दोन महिन्यांचा मैलारपूर (नळदुर्ग) येथील मुक्काम संपवून श्री खंडोबा गुरुवारी पहाटे अणदूर येथे परतले. अणदूर आणि मैलारपूर (नळदुर्ग) ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही गावात श्री खंडोबाची मंदिरे आहेत. मात्र, विशेष म्हणजे दोन्ही मंदिरांमध्ये एकच मूर्ती आहे जी वर्षभरात ठराविक काळ दोन्ही ठिकाणी राहते.
श्री खंडोबाचे अणदूर येथे सव्वादहा महिने आणि मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. चंपाषष्टी उत्सवाकरिता श्री खंडोबा अणदूरहून मैलारपूरला जातात आणि पौष पौर्णिमा महायात्रा झाल्यानंतर पुन्हा अणदूरला परत येतात.
प्रथेनुसार बुधवारी रात्री अणदूर-नळदुर्ग गावातील मानकरी मंदिरात जमले. मंदिर समितीच्या वतीने त्यांना प्रसाद वाटप करण्यात आला आणि सत्कार करण्यात आला. त्यानंतर भंडारा उधळून देवाचा करार वाचण्यात आला. पुजाऱ्यांनी मूर्ती उचलून पालखीत ठेवली आणि पालखी वाजत गाजत गुरुवारी पहाटे अणदूर येथे पोहोचली.
अणदूर येथे श्री खंडोबाच्या आगमनावेळी महिलांनी औक्षण केले आणि नंतर मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पालखी समोर दोन पांढरे शुभ्र अश्व होते. श्री खंडोबाच्या अणदूर येथे आगमन झाल्यानंतर शोभेचे दारूकाम करण्यात आले. वारू लोकांनी हलगीच्या तालावर नृत्य केले आणि गावकर्यांनी दिवट्यांच्या प्रकाशात ‘येळकोट येळकोट’ असा जयघोष केला.
देवाच्या मूर्तीचे अणदूर मंदिरात आगमन झाल्यानंतर मंदिरात सुनीता ढेपे – बचाटे यांच्या वतीने भाविकांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.