तुळजापूर: तुळजाभवानीच्या पावन नगरीत जमिनीच्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. तुळजापूर नगरपालिकेचे यात्रा मैदान चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संभाजी शिवाजीराव नेपते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बळकावलेल्या यात्रा तळाच्या चौकशीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला अमोल जाधव यांनी पाठींबा दिला आहे.
नेपते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे तुळजापूर शहरांमधील १३८/१ मधील २ हेक्टर ६३ आर जमीन शासनाने तुळजाभवानी यात्रा मैदानासाठी १९९१ मध्ये संपादित केली होती. यासाठी १५ लाख ४८ हजार ४३४ रुपये भूसंपादन रक्कम निश्चित करण्यात आली होती. मात्र, कै. देवीचंद शिवराम जगदाळे यांचे कायदेशीर वारस आणि गंगाधर उर्फ चंद्रभान चव्हाण यांनी राजकीय ताकदीचा वापर करून या जमिनीचा अवैध ताबा घेतला आहे. या जमिनीवर बोगस प्लॉटिंग करून करोडो रुपये घेऊन प्लॉट विकण्यात आले आहेत. तसेच, पत्र्याच्या शेडचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून भाडे वसूल केले जात आहे.
तुळजापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने दररोज भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्याकडून नगरपरिषद वाहनतळासाठी कर वसूल करते. मात्र, यात्रा तळासाठी राखीव असलेली जागा बेकायदेशीरपणे बळकावल्याने भाविकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो.
नेपते यांनी या प्रकरणी नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी शासनाने तहसीलदार, मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची चौकशी समिती नेमली आहे. मात्र, ही समिती काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप नेपते यांनी केला आहे.