धाराशिव – तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची ‘भावी पालकमंत्री’ ही उपाधी आता जणू त्यांच्या नावासमोर कायमची चिकटली आहे. गेल्या पाच वर्षांत तीनदा सरकार आले, गेले, बदलले, पण राणा पाटील यांचे मंत्रीपद मात्र अजूनही ‘लोडिंग…’ अवस्थेतच आहे.
२०१९ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये ‘अपग्रेड’ झाले, पण पद काही मिळाले नाही. शिंदे बंडात भाजपने सत्ता मिळवली, पण तरीही राणा पाटील यांच्या हाती फक्त भावी पालकमंत्र्याचा ‘टॅग’च आला. २०२४ मध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, मुख्यमंत्रीही बदलले, पण मंत्रीपदाने मात्र पुन्हा हुलकावणी दिली!
‘शॅडो पालकमंत्री’चा नवा अवतार
पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक आले आणि त्यांनी पहिले काम काय केले? तर आ. राणा पाटील यांच्या कट्टर विरोधक खा. ओमराजे निंबाळकर यांना पालकमंत्री कार्यालयात चक्क खास खोली देऊन टाकली! हे पाहून राणा पाटील यांच्या राजकीय आत्म्याला जबर धक्का बसला. त्यामुळे त्यांनी अखेर ‘स्वत:ला’च पालकमंत्री घोषित करून सरकारी अधिकाऱ्यांना बोलवायला सुरुवात केली.तेही जिल्हाधिकारी कार्यलयात ! त्यास जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक. जसे पालकमंत्री बैठक घेतात, तशीच हुबेहूब बैठक .
दर दोन दिवसांनी बैठकांचा सपाटा सुरू आहे. विकासकामांची चर्चा, योजनांची समीक्षा, अधिकारी गडबडले की नाही, हे पाहण्यासाठी स्वतःला ‘शॅडो पालकमंत्री’ म्हणून कार्यरत ठेवण्याचा त्यांनी नवा उपक्रम सुरू केला आहे. सरकारी बैठकीच्या खुर्चीवर ते आहेत, फक्त सरकारी आदेशावर सही करण्याचा अधिकार मात्र नाही!
पूर्वानुभव कामी आला
याआधी पालकमंत्री तानाजी सावंत असतानाही राणा पाटील यांनी अशाच बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे ‘पालकमंत्री नसताना जिल्ह्याच्या विकासाचा आढावा कसा घ्यायचा,’ याचा चांगला अनुभव त्यांना आहे. आता फक्त अधिकृतपणे मंत्रीपद मिळेल का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
सारांश काय, तर धाराशिवच्या पालकमंत्र्यांचे नाव बदलत राहते, पण ‘भावी पालकमंत्री’ पद मात्र राणा पाटील यांच्यासाठी कायम आरक्षित राहते!