धाराशिव: ठाकरे गट फुटणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं असून, सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संभाव्य फुटीर खासदारांमध्ये एक मुंबईतील तर पाच ग्रामीण भागातील असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर, धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे.
मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी यावर प्रतिक्रिया देत “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे,” असं स्पष्ट केलं आहे. तरीही, त्यांच्या आणि शिंदे गटाच्या जवळिकीबाबत चर्चा सुरूच आहेत.
पालकमंत्री कार्यालयात खासदारांसाठी दालन
धाराशिवमध्ये नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ओमराजे “महायुतीचेच आहेत,” असं विधान केलं होतं. त्यानंतर, ओमराजे यांनी सारवासारव केली असली तरी त्यांना पालकमंत्री कार्यालयात संपर्क कार्यालयासाठी जागा मिळाल्याने चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
यापूर्वी पालकमंत्री शंकरराव गडाख आणि तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात ओमराजेंनी हीच मागणी केली होती. मात्र, त्यांना जागा मिळाली नव्हती. मात्र, प्रताप सरनाईक पालकमंत्री होताच कार्यालय मिळाल्याने त्यांच्या भाजप-शिंदे गट प्रवेशाबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
ओमराजेंच्या पक्षप्रवेशाबाबत सस्पेन्स कायम
सत्ताधारी शिंदे गटाने “मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन” अंतर्गत खासदारांसाठी कार्यालय देण्याच्या नियमानुसार ही जागा मंजूर झाल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेली मागणी अचानक मंजूर झाल्याने चर्चेला अजून अधिक चालना मिळाली आहे.
ओमराजे ठाकरे गटातच राहणार का, की ते महायुतीत प्रवेश करणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.