वाशी – तालुक्यातील तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आठ जण गंभीररित्या भाजले असून त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींमध्ये पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पैकी पाच जणांना सोलापूरला हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी शेतातील बांध पेटवला होता. त्यातून उडालेल्या ठिणग्या बाबा फायर वर्कर्स कारखान्यात पडल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात फटाके बनवून वाळवण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.
सोलापूरला हलवण्यात आलेले गंभीर जखमी:
- अनिल माने (वय २८)
- चंद्रकांत उद्धव घाटुळे (वय ४०)
- साखरबाई गांधले (वय २५)
- शोभा मधुकर करडे (वय ४०)
- मंजुषा जालिंदर ओव्हाळ (वय ४५)
धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी:
- अभिजित संभाजी गायसमुद्रे (वय २६)
- शारदा राजेंद्र ओव्हाळ (वय ५३)
- सोनाली अभिजित गायसमुद्रे (वय २३)
सर्व जखमी हे कडकनाथवाडी येथील रहिवासी आहेत.
तेरखेडा येथे जवळपास २०० फटाके कारखाने आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्हा रुग्णालयात बर्न वार्ड नसल्याने जळीत, भाजलेल्या रुग्णांना तातडीने सोलापूरला हलवावे लागत असल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात बर्न वार्ड उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.