धाराशिव : जहागीरदारवाडी येथील आकाश विनायक राठोड याने धाराशिव ग्रामीण पोलिसांवर लाच मागितल्याचा, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा तसेच पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केल्याचा गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या जहागीरदारवाडी येथील वादाला नवे वळण मिळाले आहे.
राठोड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ६ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते धाराशिववरून गावाकडे जात असताना जहागीरदारवाडी तांड्याजवळ पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांनी आपण दारू पिऊन वाहन चालवत असल्याचा आरोप करून लाच मागितल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, आपण कोणतेही मद्यपान केले नसल्याचे सांगत असताना पोलिसांकडून पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. याच कारणावरून पोलिसांनी संतापून त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राठोड यांनी पुढे आरोप केला आहे की, पोलिसांनी त्यांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्या समाजाबाबत आक्षेपार्ह व जातिवाचक वक्तव्ये करण्यात आली. तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करत बेल्टने मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, तपासणीत मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले नसल्याचा दावा राठोड यांनी केला आहे. मारहाणीमुळे हाताला सूज आल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
राठोड यांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आपल्या ताब्यात असल्याचा दावा करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, याच प्रकरणात धाराशिव ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी आकाश राठोड व इतर नऊ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांना धमकावणे आणि हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांची बाजू आणि तक्रारदाराचे आरोप यामध्ये मोठा विरोधाभास निर्माण झाला असून, सत्यस्थिती चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
काय म्हटले आहेनिवेदनात?
पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या अधिकृत निवेदनात आकाश विनायक राठोड याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट ताशेरे ओढले आहेत. निवेदनानुसार:
१. दहशत आणि वसुलीचा आरोप: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी नेहमी जहागीरदारवाडी शिवारातील रेल्वे ब्रीजजवळ विनाकारण वाहने अडवून चालक आणि प्रवाशांना दमदाटी करतात आणि त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैशांची उकळती (वसुली) करत असतात, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
२. व्हिडीओ शूटिंगमुळे पोलीस संतापले: शनिवार, दि. ६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास असाच वसुलीचा प्रकार सुरू असताना, गावातील आकाश विनायक राठोड या तरुणाने धाडस दाखवून आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात पोलिसांच्या या गैरकृत्याचे व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली.
३. मोबाईल हिसकावला आणि बेदम मारहाण: आपण लाच घेताना रंगेहात कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजताच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी आकाश राठोड याला जाब विचारत त्याचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी त्याला भररस्त्यात बेदम मारहाण केली.
४. बचावासाठी खोटा गुन्हा: आपली लाचखोरी आणि मारहाणीची घटना लपवण्यासाठी पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला आणि आकाश राठोडसह गावातील इतर निष्पाप लोकांना अडकवण्यासाठी शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा आणि बनावट गुन्हा दाखल केला.
(टीप : तक्रारदाराने केलेले आरोप हे त्याच्या निवेदनावर आधारित असून त्याची स्वतंत्र शासकीय पुष्टी झालेली नाही.)






