धाराशिव – शिंगोली येथील श्रीकांत दगडू इंगळे (वय ५२) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २.५४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत इंगळे हे २८ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १.३० च्या दरम्यान घराबाहेर गेले होते. याच वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील ५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १,९४,००० रुपये रोख रक्कम असा एकूण २,५४,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घरी परतल्यानंतर इंगळे यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ आनंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. इंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.