बेंबळी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तीन धाडसी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण ही कारवाई पोलिसांच्या ‘गांभीर्याची’ चुणूक दाखवणारी ठरली. कारण गुन्हा दाखल केला, पण गाडी जप्त करायची विसरले! म्हणजे आरोपींना चालत न्यायचं ठरवलं होतं का? की गाडी अदृश्य झाली होती?
‘बादशहा’ गुटखा आणि ‘राजा’ पोलिसांची कारवाई!
ही तुफान धाडसी कारवाई करताना पोलिसांनी तब्बल 128 पुडे गुटखा (कीव येईल इतकीच संख्या!) जप्त करून त्याची 15,360 रुपये इतकी भली मोठी किंमत घोषित केली. एवढ्या तुटपुंज्या गुटख्यासाठी एवढी मोठी मोहीम? आणि गाडी मात्र हवेत गायब?
आता खरी गंमत बघा—धाराशिव लाइव्हने या ‘बिनडोक’ कारवाईवर प्रकाश टाकताच पोलिसांची सटकली! मग काय, तातडीने धावपळ सुरू झाली आणि अखेर पोलिसांनी एक कार जप्त केली. पण या कारवाईमागची खरी गोम समजल्यावर डोक्याला हात लावावा लागला!
मॅडम गंगास्नानाला, आणि भाऊ गुटखा धंद्यात!
या गुटखा साम्राज्याचा प्रमुख आरोपी प्रशांत टेळे हा एका बिट अंमलदार महिला कॉन्स्टेबल मॅडमचा भाऊ! मॅडम सध्या प्रयागराजला कुंभमेळ्यात आपल्या पापांचा प्रायश्चित्त घेण्यासाठी गंगास्नानाला गेल्या आहेत. पण इकडे त्यांच्या ‘पापी’ भावाचा पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.
आता प्रश्न असा आहे की मॅडम गंगास्नान करीत असताना, त्यांच्या आशीर्वादाने भाऊ गुटख्याचा ‘प्रसाद’ वाटत होता का? धाराशिवहून कारने आणलेला हा बादशहा गुटखा बेंबळीतील टपऱ्या, हॉटेल्स, किराणा दुकानांपर्यंत पुरवण्याचं काम व्यवस्थित चालू होतं.
पोलिसांना हप्ता मिळत नव्हता म्हणून ‘थोडीशी कारवाई’!
बेंबळी पोलिसांची मूळ समस्या काय होती, हेही समजलं—हप्ता कमी मिळाला! म्हणजे ‘काहीतरी’ घडवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आणि मग चुलीवर पाणी तापवण्यापुरती ही दिखाऊ कारवाई झाली. पण अडचण अशी की धाराशिव लाइव्हने हा सगळा भंडाफोड केला आणि पोलिसांची ‘दात विचकण्याची’ वेळ आली.
गंगास्नान केल्याने पाप धुतले जातात, पण…
आता पाहायचं एवढंच की प्रयागराजच्या गंगास्नानात मॅडमचं पाप धुतलं जाईल का? कारण त्यांच्या भावाचा धंदा बेंबळी पोलिसांनी पुरता धुतलेला आहे!