कळंब – कळंब-ढोकी राज्यमार्ग २०८ वर साखळी क्रमांक १/६०० मध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूला पुलाजवळ अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी बांधकाम विभागाने कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एस.एस. वायकर यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाजवळ काही अज्ञात व्यक्ती बांधकाम करत असल्याचे दिसून आले. हे बांधकाम रस्त्याच्या हद्दीत असून त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
या अनधिकृत बांधकामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला कामकाज करण्यास अडथळा येत आहे. तसेच, पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार दाखल करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. तसेच, बांधकामाचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे.