धाराशिव… नाव बदलून एक वर्ष झालं, पण परिस्थिती जुनीच. एखाद्या झाडासारखं शहर वाढतंय, पण फक्त फांद्या पसरण्यासाठी. मुळं मात्र कुजताहेत! गल्लीबोळांत नवीन कॉलन्या झाल्या, मोठमोठे बंगले उभे राहिले, पण शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांची अवस्था अजूनही तशीच. कुठे खड्डे, कुठे धुळीचे ढग, आणि कुठे निकृष्ट दर्जाची डांबराची चाळण!
शहराच्या विकासासाठी प्रचंड योजनांची घोषणा झाली. पण या योजनांचं वास्तव काय? ‘भुयारी गटार योजना’ पूर्ण झाली असं सांगितलं जातं, पण ही योजना कागदावरच झाली. पाईपमध्ये मैला वाहायचा होता, पण त्यात मातीच भरली गेली. एवढंच नाही, तर काही भागात पाइप टाकलाच गेला नाही. ज्या ठिकाणी पाइप टाकला, तिथेही निकृष्ट दर्जाचं काम झालं.
या योजनेमुळे शहराच्या रस्त्यांची पार वाट लागली. काम सुरू झाल्यावर रस्ते खोदले, पण परत बुजवलेच नाहीत. यामुळे चालणाऱ्यांपासून वाहनधारकांपर्यंत सगळे त्रस्त! सरकारने या रस्त्यांसाठी १०० कोटींहून अधिक रक्कम मंजूर केली, पण ती नेमकी कोणाकडे जावी यावरून दोन राजकीय नेत्यांमध्ये भांडण सुरू झालं. काही कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेली, तर काही नगर परिषदेकडे. म्हणजे यावरही राजकारण!
टेंडरचा खेळ आणि टक्केवारीचा जुगाड
रस्त्यांचे टेंडर निघाले, पण ते कोणाला मिळाले? अगदी अपेक्षेप्रमाणे, प्रत्येक टेंडर राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांना मिळाले. काही ठेकेदार राजकारण्यांचे कट्टर समर्थक, तर काही त्यांचे हक्काचे देणेकरी. मग त्यांना ठरावीक ‘टक्केवारी’ दिल्याशिवाय हे टेंडर कसं मिळणार? परिणामी, कामे सुरू होतात, पण पूर्ण होत नाहीत. आणि जी पूर्ण होतात, ती तितक्याच निकृष्ट दर्जाची असतात.
याच गुत्तेदारांनी घेतलेल्या एका रस्त्याच्या खड्ड्यात पडून अलीकडेच एका तरुणाचा मृत्यू झाला. शहर हादरलं. मग काय? लगेचच एका राजकीय पक्षाने आंदोलन पुकारलं. पण गंमत म्हणजे, आंदोलन करणारे आणि निकृष्ट काम करणारे गुत्तेदार हे दोघंही एकाच पक्षाचे! एकाने टेंडर मिळवून पैसा खाल्ला, तर दुसऱ्याने त्या चुकीच्या कामाविरोधातच रस्त्यावर आंदोलन केलं. जणू काही जनतेच्या हितासाठी लढतोय असं भासवायचं आणि बाजूने फायदाही मिळवायचा!
उपोषणाची नौटंकी आणि पब्लिसिटी स्टंट
या तमाशात अजून एक नवा प्रयोग झाला. एका पक्षाच्या कार्यकर्त्याने उपोषण सुरू केलं. ‘शहराच्या रस्त्यांची दुरवस्था दूर झाली पाहिजे,’ असं म्हणत स्वतःला समाजसेवक म्हणून मिरवू लागला. पण खरी गोम अशी होती की, ज्या रस्त्याचं काम अर्धवट पडलं, ते काम करणारा गुत्तेदार त्याचाच पक्षसखा! उपोषण करणारा, गुत्तेदाराचा जिगरी दोस्त, आणि त्याच पक्षाचा मोठा नेता उपोषण सोडवायला हजर! म्हणजे एकाच पक्षाने हे संपूर्ण नाटक लिहिलं, दिग्दर्शित केलं, आणि अभिनयही केला. नागरिकांनीही पहिल्यांदा या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहिलं, पण जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा सगळ्यांचा विश्वास उडाला.
रस्ते निकृष्ट, पण होर्डिंग मात्र दमदार!
या शहरात विकासाच्या नावाने बोंब असली, तरी नेत्यांचे वाढदिवस मात्र जोरात साजरे होतात. ‘धाराशिवचा सुपुत्र अमुकतमुक’ असे मोठमोठे अनधिकृत फलक ठिकठिकाणी झळकतात. या फलकांवर नेत्याच्या डाव्या-उजव्या हाताला असलेले सगळी ‘पुंडगिरी मंडळी’ आपापले फोटो लावून बसतात. विकासाच्या घोषणा केवळ घोषणाच राहतात, पण या नेत्यांचे स्मितहास्य मात्र प्रत्येक चौकात झळकत असते.
जनतेने आता ‘खड्डे’ भरायला हवेत!
शहरात एवढ्या समस्या असताना सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आपला ‘डाव’ साधत आहेत. नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही निधी मिळवण्याच्या चढाओढीत मग्न आहेत, पण प्रत्यक्षात काम होत नाही. कोणत्याही पक्षाला जनतेच्या समस्या सोडवायच्या नाहीत, फक्त त्या समस्यांतून आपला राजकीय फायदा साधायचा आहे.
पण जनता किती दिवस हे सहन करणार? आता ही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनीच पुढे यायला हवं. ज्या राजकीय कार्यकर्त्यांना फक्त चमकोगिरी करायची आहे, टक्केवारीच्या जोरावर निधी लाटायचा आहे, आणि केवळ फोटोंसाठी समाजसेवक बनायचं आहे, त्यांना आता खड्ड्यांप्रमाणेच बाजूला करण्याची वेळ आली आहे. कारण हे नेते जर ठेकेदारांना जवाबदार धरू शकत नसतील, तर जनता त्यांनाही उत्तर देईल!
धाराशिवचं नाव बदललं, पण परिस्थिती तशीच आहे. पण आता हे नशीब बदलायचं असेल, तर खऱ्या अर्थाने जनतेनेच जागं होणं गरजेचं आहे. नाहीतर हे शहर फक्त राजकीय गुत्तेदारांच्या खड्ड्यांत अडकतच जाईल!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह