पत्रकारिता ही केवळ एक नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे. कुठलाही प्रश्न असो, अन्याय असो, किंवा समाजाच्या हिताचा मुद्दा असो—तो समोर आणायचा, आवाज उठवायचा, आणि परिस्थिती बदलायला भाग पाडायचं हे आमचं काम! धाराशिव लाइव्ह हा केवळ डिजिटल चॅनल नाही, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करणारा एक निर्धार आहे.
धंदा नाही, धर्म आहे!
पत्रकारिता कधीही धंदा नाही झाला, होऊ दिला नाही आणि होणारही नाही! कोणत्याही सत्तेच्या, कोणत्याही नेत्याच्या, किंवा कोणत्याही दबावाच्या आम्ही गुलाम नाही. आम्हाला ना विकत घेता येतं, ना धमकावून गप्प बसवता येतं. लोकशाहीत जनता ही खरी ताकद असते, आणि धाराशिव लाइव्ह तिच्या बाजूने ठाम उभा आहे.
धाराशिव लाइव्ह म्हणजे आवाज, धाराशिव लाइव्ह म्हणजे लढाई!
गेल्या १३ वर्षांत कितीही वादळं आली, कितीही खोट्या केसांचा डोंब आला, पण आमचं कलम झुकलं नाही, आणि आमचा आवाज थांबला नाही. निर्भीड पत्रकारिता करण्याची किंमत मोजावी लागते, पण सत्याचा मार्ग सोडायचा नाही, हा आमचा संस्कार आहे.
कालचं ताजं उदाहरण घ्या—धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालेली एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलवण्याचा सरकारचा निर्णय आम्ही पहिल्यांदा समोर आणला. लोक जागे झाले, नेते एकवटले आणि अखेर शासनाला निर्णय मागे घ्यावा लागला. हीच खरी पत्रकारिता!
सत्ता कोणाचीही असो, धाराशिव लाइव्ह गप्प बसणार नाही!
आमच्या नजरेत आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे फक्त पदं आहेत, व्यक्ती नाहीत. कोणीही चुकीचं वागलं, तर बातमी आलीच! तसंच, कोणी चांगलं काम केलं, तर कौतुक करायलाही आम्ही मागेपुढे पाहत नाही. विकास हे आमचं ध्येय आहे, अन्यायाविरुद्ध लढणं हे आमचं कर्तव्य आहे.
धाराशिव लाइव्हवर विश्वास ठेवा, अफवांवर नाही!
आम्ही बातमी छापण्यासाठी पैसे घेत नाही आणि बातमी दडपण्यासाठी पैसे मागत नाही. जर कोणी धाराशिव लाइव्हच्या नावाखाली पैसे मागत असेल, दबाव टाकत असेल, तर आम्ही त्याला जबाबदार नाही. अशा फसवणुकीला बळी पडू नका—थेट संपादक सुनील ढेपे यांच्याशी संपर्क साधा.
हा प्रवास थांबणारा नाही!
पत्रकारितेत ३५ वर्षांचा प्रवास आणि ४० हून अधिक पुरस्कार! पण हा प्रवास अजून संपलेला नाही. कारण अन्याय संपलेला नाही, विकासाची लढाई थांबलेली नाही आणि धाराशिव लाइव्हचा आवाज मावळलेला नाही!
जनता हीच आमची ताकद आहे, आणि धाराशिव लाइव्ह तिच्या न्यायाच्या लढाईसाठी सदैव सज्ज आहे!