उमरगा: उमरगा शहरातील सिध्देश्वर ज्वेलर्समध्ये अज्ञात व्यक्तीने महिलेची ५० हजार रुपयांची रोकड, दोन बँक पासबुक आणि आधार कार्ड असलेली पिशवी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनाली दीपक बंडगर (वय ३०, रा. कसगीवाडी) यांची सासू बँकेतून पैसे काढून सोनाराकडे गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत सोनाली बंडगर या देखील गेल्या होत्या. सिध्देश्वर ज्वेलर्समध्ये त्यांची सासू सोने सोडवत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांची पिशवी चोरली. या पिशवीत ५० हजार रुपये रोख, दोन बँक पासबुक आणि आधार कार्ड होते.
या घटनेची माहिती सोनाली बंडगर यांनी उमरगा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मोटरसायकल चोरीला; नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अणदूर – येथील सुधाकर अच्युतराव सांगळे यांच्या मालकीची १५ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीला गेली आहे. १६ जानेवारी रोजी दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ही मोटरसायकल जि. प. प्रा. शाळेसमोरून चोरून नेली.
या प्रकरणी सुधाकर सांगळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.