तुळजापूर तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबांचा अनधिकृत एसी हलवण्यात आला. आता धाराशिवकर विचारत आहेत – “धाराशिव तहसील कार्यालयात तयार करण्यात आलेले ‘आपकी अदालत’ केबिन कधी हटवणार?”
‘वाजे सिस्टर’चं चमत्कारीक न्यायासन!
धाराशिव तहसील कार्यालयात तहसीलदार मॅडमने आपल्या केबिनचं थेट “आपकी अदालत” स्टुडिओमध्ये रूपांतर केल्याची चर्चा आहे. सरकारी केबिनला चबुतऱ्यावर उंच बसवून त्याभोवती चारही बाजूंनी बंदिस्त कटघरा उभारण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून सरकारी कार्यालयं असतात, पण इथे न्यायाधीशाची ‘अदालती थाट’ मॅडमने मिरवायला सुरुवात केली आहे!
एसीचा थंड गारवा आणि सरकारी रुबाब
धाराशिवच्या तहसील कार्यालयात देखील एसी बसवण्यात आला आहे. पण तो कामाच्या सोयीसाठी आहे की वैभव प्रदर्शनासाठी, हा प्रश्न उभा आहे. सरकारी अधिकारी एसीमध्ये थंडगार बसतील आणि उकाड्यात ताटकळणाऱ्या नागरिकांना मात्र गरम हवेतच नाहत बसावं लागेल, असाच हा प्रकार आहे.
‘सामान्य जनता तळात, मॅडम फुटभर उंच’
ही केबिन पाहून तहसील कार्यालय आहे की राजवाडा? असा प्रश्न जनतेला पडतो. सामान्य नागरिकांना भेटायला गेले की मॅडम ‘फुटभर उंच’ बसलेल्या असतात. शासनाने अधिकारी आणि जनतेत अंतर नको, असे नियम केले आहेत, पण इथे मात्र जनतेपासून स्वतःला वेगळं ठेवलं जातंय!
‘फटके’ बसू नयेत म्हणून कटघरा?
लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, चारही बाजूंनी बंदिस्त कटघरा उभारण्यामागे उद्देश फक्त ‘सुरक्षितता’ नव्हे, तर जनतेच्या रोषापासून संरक्षण असावा! लोकांना भेटताना एखाद्या गुन्हेगारासारखे कटघऱ्यातून भेटावे लागत असेल तर हा अपमान नाही का?
अजित पवार नाराज – ‘हे चबुतरं कशासाठी?’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधीच अशी खास चबुतरी व्यवस्था करण्यावर नाराजी व्यक्त केली होती. “सर्व अधिकारी समान आहेत, मग तहसीलदारांसाठीच असा खास चबुतरा का?” असा थेट सवाल त्यांनी केला होता. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे असा खास आसन नाही, मग तहसीलदार मॅडमलाच का?
धाराशिवकरांचा सवाल – ‘हे आपकी अदालत केबिन कधी उखडणार?’
तुळजापूरमध्ये तहसीलदारांचा अनधिकृत एसी हलवल्यानंतर धाराशिवकर देखील आता विचारू लागले आहेत – “हे ‘आपकी अदालत’ केबिन कधी काढणार?” सरकारी पैशांचा असा चुराडा करणं म्हणजे लोकांच्या कररूपाने दिलेल्या पैशांचा अपमान आहे. तहसीलदारांचा हा ‘केबिन ड्रामा’ आता लवकरच संपेल अशी धाराशिवकरांना आशा आहे!