धाराशिव शहरात एक ‘धंदा’ चांगलाच तेजीत आहे—सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा! कोणतेही ठोस पुरावे नसताना, मोठमोठ्या नावांचा वापर करत, खोट्या तक्रारी दाखल करून सरकारी यंत्रणांना जखडून टाकणाऱ्या टोळक्यांचे फावते आहे. आता तर या धंद्याने इतका कहर केला आहे की, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातही काही जण संधी शोधून पैसे उकळायला निघाले.
आयत्या बिळावर नागोबा!
या सर्व प्रकरणात एक नाव पुढे आले—आशिष विशाळ! हा इसम स्वतःला आमदार सुरेश धस यांचा खासगी पीए असल्याचे सांगतो. आणि मग याचा पुढचा कारनामा ऐकाच—सरकारी अधिकाऱ्यांना ‘देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करायची आहे’ असे सांगून थेट खंडणी मागणे! पण यावेळी तो गंडला. संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला, आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
पत्राशिवायच पत्र!
या भामट्याने केवळ हाच उद्योग केला नाही. धाराशिवमध्ये त्याने मोठमोठ्या नावांचा धाक दाखवत सरकारी अधिकाऱ्यांवर खोट्या तक्रारी दाखल करण्याचा सपाटा लावला. आणि गंमत म्हणजे, ह्या तक्रारी आमदार सुरेश धस यांच्या नावाने लिहिलेल्या असायच्या—त्यांच्याच लेटरपॅडवर! चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी अधिकारी त्याला पैसे द्यायचे आणि या माणसाची पोळी भाजत जायची. गेली दोन वर्षे हा गोरखधंदा सुरू होता.
ब्लॅकमेलिंग इंडस्ट्री!
धाराशिवसारख्या तुलनेने शांत जिल्ह्यात काही लोकांनी ‘ब्लॅकमेलिंग इंडस्ट्री’च सुरू केली आहे. एका माजी मुख्याधिकाऱ्यालाही अशाच फसवणुकीला सामोरे जावे लागले. तक्रारींचा धाक दाखवून आणि प्रकरणे मिटवायचे नाटक करून त्याने स्वतःला आलिशान गाडी घेऊन दिली. हे सगळे ‘समाजसेवेच्या’ नावाखाली सुरू होते. पण खरा प्रश्न असा आहे की, या सगळ्या प्रकाराला आमदार सुरेश धस यांचा पाठिंबा होता का?
समाजसेवा की खंडणी सेवा?
धाराशिवमध्ये उद्योगधंदे फारसे नाहीत. त्यामुळे काही भामटे सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच ‘उद्योग’ बनवून बसले आहेत. तक्रारींची टांगती तलवार लावायची, चौकशीचा बडगा उगारायचा आणि मग पैसे घेऊन प्रकरण मिटवायचे! हा धंदा दिवसेंदिवस फोफावत आहे.
वेळीच सावध व्हा!
सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनीही आता सावध होण्याची वेळ आली आहे. जर कोणी असे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तडजोड करण्याऐवजी सरळ पोलीस ठाणे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) तक्रार करणे गरजेचे आहे. नाहीतर ‘समाजसेवेचा’ मुखवटा घालून असे भामटे बळी शोधतच राहतील!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह